Sunday, May 17, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रत्नागिरी रेल्वे स्थानकातील विश्रामगृहमध्ये चोरी करणारा आरोपी ताब्यात

रत्नागिरी रेल्वे स्थानकातील विश्रामगृहमध्ये चोरी करणारा आरोपी ताब्यात

रत्नागिरी:- कोकण रेल्वे स्टेशन रत्नागिरी येथील वातानुकूलित विश्राम गृहामध्ये रिसेप्शन टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रोख रक्कम घेऊन पळण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला शहर पोलिसांनी एसटी स्टँड येथून ताब्यात घेतले.

रत्नागिरी रेल्वे स्थानक येथील विश्राम गृहात दर तासाच्या भाड्याप्रमाणे संशयित आरोपी तेजस अजित छाबडा (32 वर्षे, राहणार इगतपुरी नाशिक) हा विश्रांती करिता काही दिवस थांबला होता. ६ जून रोजी सकाळी 8.55 वाजण्याच्या सुमारास आरोपी याने तेथील रिसेप्शनिस्टची नजर चुकवून व उचित संधी साधून तेथील रिसेप्शन टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली रोख रक्कम 25,000 असलेला डबा चोरून पळून गेलेला होता.

या बाबत रेल्वे स्टेशन पासून काही अंतरावर असलेल्या कुवारबाव चौकी मधील उपस्थित पोलीसांना याची माहिती मिळाली. या घटनेची गंभीर दखल घेत कुवारबाव पोलीस चौकीचे पोलीस अंमलदार हे तात्काळ कोकण रेल्वे स्टेशन, रत्नागिरी येथील वातानुकूलित विश्राम गृह मध्ये दाखल झाले. त्यांनी रिसेप्शन काऊंटर वरील सी.सी.टि.व्ही. कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता आरोपीच्या अंगावरील कपडे व त्याचा पेहराव हेरून तो रिक्षात बसल्याचे निष्पन्न केले.

या मिळालेल्या माहितीच्या आधारे रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील डिटेक्शन टिमच्या अंमलदारांमार्फत या रिक्षाचा रत्नागिरी रेल्वेस्टेशन ते रत्नागिरी एस.टी. स्टँड असा तात्काळ पाठलाग करण्यात आला व आरोपीला एस.टी. स्टँड येथून लागलीच ताब्यात घेण्यात आले.

आरोपी तेजस अजित छाबडा याला या पथकामार्फत ताब्यात घेण्यात आलेले आहे तसेच त्याच्या विरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 239/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 305 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्याकडून चोरण्यात आलेला 100 टक्के मुद्दे माल हस्तगत करण्यात आलेला आहे.

ही, कामगिरी मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी श्री. नीलेश माईनकर यांचे मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. सतीश शिवरकर,  पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.