रत्नागिरी:- शहरात मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बसस्थानकासमोर मद्यधुंद तरुणांचा जोरदार राडा झाला. एकमेकांना अर्वाच्य शिवीगाळ अंगावर धावून जाण्याच्या प्रकारामुळे वाहतूक कोंडी झाली. त्यातील काहींनी एकमेकांची समजूत काढत तेथून काढता पाय घेतला; परंतु कशावरून वाद झाले, हे समजू शकले नाही.
दोन दिवसांपूर्वी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नवीन बसस्थानकासमोर हा राडा सुरू होता. काही तरुण एकमेकांच्या अंगावर धावून जात होते. त्यांची आरडाओरंड आणि राड्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या बघ्यांची गर्दी वाढत गेली. रस्त्यातच हा राडा सुरू झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी होत होती; परंतु काहीजण पाहूनही त्याकडे कानाडोळा करत होते. तर काहीजण बघण्यासाठी थांबत होते. कोण कोणाला मारतोय आणि कोण कोणाला सोडवतोय, हेच कळत नव्हते. राडा करणारे मद्यधुंद असल्याने स्वतःला सावरता येत नसताना दुसऱ्याच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, ११२ टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यानंतर राडा करणाऱ्यांनी काढता पाय घेतला.









