Saturday, May 9, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीत धडकले धुळीचे वादळ!

रत्नागिरीत धडकले धुळीचे वादळ!

गावागावातील बत्ती गुल; आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान

रत्नागिरी:- रत्नागिरीत शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास धुळीचे वादळ धडकले. सायंकाळी अचानक हवामानात बदल झाला आणि अवघ्या काही मिनिटात रत्नागिरीत वादळी वारे दाखल झाले. वादळी वाऱ्या सोबत उंच आकाशात धुळीचे लोळ उठले. ताशी 20 किलोमीटर वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रत्नागिरीकरांचे अक्षरशः पुरते हाल झाले. तब्बल एक तासाहून अधिक काळ सुटलेल्या वादळी वाऱ्यांमुळे रत्नागिरीत मोठे नुकसान झाले असून पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मागील काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अशातच हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने देखील हजेरी लावली होती. हवामान विभागाने जिल्ह्याला धुळीच्या वादळाचा इशारा सूचित केला होता. शनिवारी सायंकाळी महाराष्ट्रात, विशेषतः रत्नागिरी आणि ठाणे (कल्याण-डोंबिवली) परिसरात, अवकाळी पावसाआधी सोसाट्याचा वारा आणि प्रचंड धुळीचे वादळ आले. या वादळामुळे दृश्यमानता कमी होऊन नागरिकांची तारांबळ उडाली, झाडे पडली आणि वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. हे वादळ प्रामुख्याने कोरड्या हवामानात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धूळ उडाल्याने निर्माण झाले असे हवामान विभागातील मंडळींनी सांगितले.

शनिवारी दुपारपर्यंत कडाक्याचे ऊन आणि उकाडा जाणवत असतानाच, अचानक आकाशात ढगांची दाटी झाली. पाऊस पडेल असे वाटत असतानाच वेगवान वाऱ्यानी शहराला रत्नागिरीत हजेरी लावली. वाऱ्याच्या तीव्रतेमुळे रस्त्यांवरील धूळ मोठ्या प्रमाणात हवेत उडाल्याने समोरचि दृश्यमानता देखील कमी झाली. शहरातील मुख्य बाजारपेठ, मारुती मंदिर परिसर आणि साळवी स्टॉप यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना स्वतःला सांभाळत सुरक्षित आश्रय घ्यावा लागला.

​या वादळाचा जोर इतका होता की, ठिकठिकाणचे वृक्ष जोरदार हेलकावे खात होते. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांवरील आणि दुकानांवरील पत्रे उडाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. काही कच्च्या घरांचे आणि तात्पुरत्या शेडचे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्याच्या वेगामुळे वीजवाहिन्या एकमेकांना घासून शॉर्ट सर्किट होण्याच्या भीतीने अनेक भागांतील वीजपुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून खंडित करण्यात आला होता.
​रस्त्यावरील वाहनचालकांना या धुळीच्या वादळाचा सर्वाधिक फटका बसला. दुचाकीस्वारांना समोरचे दिसत नसल्याने त्यांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली होती. समुद्रावरून येणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे किनारी भागातही मोठी खळबळ उडाली. हे वादळ साधारण अर्धा ते पाऊण तास सुरू होते, ज्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.
​संध्याकाळच्या वेळी अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे रत्नागिरीकरांमध्ये भीतीचे वातावरण होते. वादळ शमल्यानंतर सगळीकडे झाडांचा पालापाचोळा आणि धुळीचे थर साचलेले पाहायला मिळाले. सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र मालमत्तेचे किरकोळ नुकसान झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार हा मान्सूनपूर्व वळवाच्या पावसाचा परिणाम असल्याचे सांगितले जात असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.