रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने गुन्हे तपासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. गुन्ह्यांचा दर्जेदार, परिणामकारक आणि वेळेत तपास करण्यावर विशेष भर दिल्याने, प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण अत्यंत कमी राखण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी पार पडली आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2025 ते 01 एप्रिल 2026 या कालावधीतील तपासाचा आढावा घेतला या कालावधीत गंभीर गुन्ह्यांमध्ये एकूण 1,777 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 92.35% गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी पूर्ण केला असून, केवळ 7.65% (136) गुन्हे प्रलंबित आहेत. दारूबंदी गुन्हे या अंतर्गत एकूण 2,552 गुन्ह्यांची नोंद झाली होती. यातील 96.75% गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्यात आला आहे. केवळ 3.25% (83) गुन्हेच प्रलंबित असून, ही कामगिरी अत्यंत समाधानकारक मानली जात आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचे फळ
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या प्रभावी पर्यवेक्षणामुळे आणि सातत्यपूर्ण आढाव्यामुळे शक्य झाली आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्व तपासी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेल्या जलद, सखोल आणि गुणवत्तापूर्ण तपासाचे हे फळ असल्याचे बोलले जात आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल कटिबद्ध
रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना जलद न्याय मिळावा, गुन्हेगारांवर कडक कारवाई व्हावी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट व्हावी, यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सातत्याने कार्यरत आहे. भविष्यातही गुन्हे तपासातील गुणवत्ता, गती आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या कामगिरीमुळे रत्नागिरी पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.









