११ लाखांहून अधिक नुकसान, चालकाचा पलायन
रत्नागिरी:- रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील मिरजोळे येथे एका बेदरकार बल्कर चालकाने विद्युत खांबांना आणि ट्रान्सफॉर्मरला जोरदार धडक दिली. या अपघातात महावितरणचे सुमारे ११ लाख १७ हजार ५६२ रुपयांचे नुकसान झाले असून, अपघातानंतर चालक बल्कर सोडून फरार झाला आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी ५:४० वाजण्याच्या सुमारास मिरजोळे एमआयडीसीमधील ओमकार कॅश्यूकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात घडला. एमआयडीसी कुवारबाव शाखेचे सहाय्यक अभियंता प्रफुल्ल रवींद्र साळवे यांना स्थानिक ग्राहकांनी फोन करून माहिती दिली की, एका बल्करने विद्युत खांब पाडले आहेत. साळवे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, तेथे सहा विद्युत खांब, विजेच्या तारा आणि ट्रान्सफॉर्मर डिस्ट्रीब्यूशन बॉक्स पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे दिसून आले.
आशादीप संस्थेसमोर हा अपघात घडला असून, तेथील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव जाणाऱ्या बल्करने हे नुकसान केले आहे. हा बल्कर तुषार साळवी (रा. फणसोप, रत्नागिरी) यांच्या मालकीचा असल्याचे तपासात समोर आले आहे.
बल्कर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन हयगयीने आणि बेदरकारपणे चालवल्याने हा अपघात झाला. यामध्ये ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चरसह एकूण ११ लाख १७ हजार ५६२ रुपयांचे शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले आहे. यामुळे परिसरातील वीज पुरवठाही खंडित झाला होता.
याप्रकरणी सहाय्यक अभियंता प्रफुल्ल साळवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात बल्कर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, ३२४(५), मोटार वाहन कायदा कलम १८४ आणि विद्युत कायदा २००३ चे कलम १३९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत.









