Thursday, July 23, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रत्नागिरीत संशयित बँक खात्यातून १ कोटीची फसवणूक

रत्नागिरीत संशयित बँक खात्यातून १ कोटीची फसवणूक

इंडियन ओव्हरसिज बँकेच्या खात्यातून सायबर गंडा; संशयित खातेधारकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील जुना माळनाका येथील इंडियन ओव्हरसिज बँकेतील एका संशयित खात्याच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विविध सायबर गुन्ह्यांशी संबंधित एकूण ४६ तक्रारी या खात्याशी जोडल्या गेल्या असून, त्यापैकी ९ तक्रारींमध्ये १ कोटी ५ लाख ८८ हजार ६८ रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात संशयित खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना १ जानेवारी ते २० जुलै २०२६ या कालावधीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (एनसीसीआरपी) व सायबर पोलिस ठाण्याकडून प्राप्त झालेल्या ‘म्युल अकाउंट’च्या माहितीनुसार तपास करण्यात आला. त्यामध्ये रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुना माळनाका रोडवरील इंडियन ओव्हरसिज बँकेतील एका संशयित खात्याचा वापर इतर आरोपींच्या मदतीने देशभरातील नागरिकांची विविध प्रकारे दिशाभूल करून, तोतयेगिरी करत ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी करण्यात आल्याचे समोर आले.
तपासादरम्यान या खात्याशी संबंधित देशभरातील एकूण ४६ सायबर तक्रारी आढळून आल्या. त्यापैकी ९ प्रकरणांमध्ये १ कोटी ५ लाख ८८ हजार ६८ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित ३७ तक्रारींमध्येही याच बँक खात्यामार्फत ऑनलाइन व्यवहार करून फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, त्याचा तपास सुरू आहे.
या प्रकरणी पोलिस हवालदार वैभव शिवलकर यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित खातेधारकाविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करीत आहेत.