बनावट व्हॉट्सॲप मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहन
रत्नागिरी:- जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने व छायाचित्रांचा गैरवापर करून सायबर फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत आहेत. बनावट व्हॉट्सॲप खात्यांच्या माध्यमातून नागरिकांकडे पैशांची मागणी केली जात असल्याने अशा फसव्या संदेशांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून काही समाजकंटक वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नाव व फोटो वापरून बनावट मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सॲप संदेश पाठवत आहेत. अत्यंत तातडीची गरज आहे, असे भासवून संबंधितांकडून बँकखाते क्रमांक किंवा युपीआयद्वारे पैसे पाठवण्याची मागणी केली जात आहे. हा प्रकार गंभीर असून, प्रशासनाने त्याची दखल घेतली आहे. याबाबत प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कोणताही वरिष्ठ अधिकारी वैयक्तिकरित्या किंवा अनोळखी क्रमांकावरून कधीही आर्थिक मदतीची मागणी करत नाही. त्यामुळे असा कोणताही संदेश प्राप्त झाल्यास त्याची खातरजमा करावी. अज्ञात किंवा संशयास्पद क्रमांकावरून आलेल्या संदेशांमधील बँकखात्यावर व्यवहार करू नयेत तसेच, अप्रमाणित किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळावे. नागरिकांनी आपली वैयक्तिक तसेच कार्यालयीन गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तींशी शेअर करू नये आणि अशा संदेशांना प्रतिसाद देणे टाळावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
…तर पोलिस ठाण्यात संपर्क करा
सायबर फसवणूक झाल्यास किंवा संशयास्पद संदेश आल्यास तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यात किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. तसेच सायबर सेलशी संपर्क साधावा. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने पाठवण्यात येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









