Sunday, May 3, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीत बांधकाम कामगारांच्या योजनांचा बोजवारा

रत्नागिरीत बांधकाम कामगारांच्या योजनांचा बोजवारा

‘आरआरओ’ अधिकारी नसल्याने कामे ठप्प

रत्नागिरी:- जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत मोठी दिरंगाई होत असून, कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष नारायणराव खोराटे यांनी सहाय्यक आयुक्त संदेश आयरे यांची भेट घेऊन कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर जाब विचारला.

या भेटीत खोराटे यांनी प्रशासनाच्या कारभारावर कडक ताशेरे ओढले. गेल्या एक वर्षापासून गरोदर महिला कामगारांना मिळणारा लाभ बंद असून, ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर मंजुरी मिळण्यासाठी तब्बल ६ ते ८ महिने लागतात. या विलंबामुळे जर एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला किंवा अपघात झाला, तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, मुलांची शिष्यवृत्ती वेळेत मिळत नाही, तोपर्यंत कामगाराच्या नोंदणीची मुदत संपलेली असते. यामुळे कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याची व्यथा त्यांनी मांडली. घरगुती वस्तू आणि सुरक्षा संचही वेळेत मिळत नसल्याने कामगार मेटाकुटीला आले आहेत.

या तक्रारींवर उत्तर देताना सहाय्यक आयुक्त संदेश आयरे यांनी प्रशासकीय अडचण स्पष्ट केली. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून अर्ज मंजूर करणारे ‘आरआरओ’ (लेबर ऑफिसर) उपलब्ध नसल्याने ही कामे रखडली असल्याची कबुली त्यांनी दिली. यावर आक्रमक पवित्रा घेत, अध्यक्ष खोराटे यांनी लवकरच कामगार मंत्र्यांची भेट घेऊन जिल्ह्यात तातडीने आरआरओ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.

यावेळी कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष ताजुद्दीन कल्पे, सभासद प्रताप मुरकर, अब्दुल काझी, शंकर स्वामी आणि मारुती कंगराळकर यांसह अनेक पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.