रत्नागिरीत ओळखीचा फायदा घेत सोन्याच्या अंगठ्यांच्या माध्यमातून दीड लाखांची फसवणूक

एकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- एका ओळखीच्या व्यक्तीने विश्वासाने दिलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्या चोरून विकल्याचा आणि त्यावर कर्ज काढून आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत समोर आला आहे. याप्रकरणी जयेश खानविलकर याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​फिर्यादी प्रसाद रवींद्र पोकळे (वय २५, रा. मारुती मंदिर, रत्नागिरी) हे आरोग्य मंदिर येथील हॉटेल ‘सितारा इन’मध्ये कामाला असताना, दि. २९ मार्च २०२६ रोजी त्यांनी त्यांच्या ओळखीचे आरोपी जयेश खानविलकर (वय २३, रा. राजीवडा, मूळ रा. शांतीनगर) याला आपल्या वडिलांच्या मालकीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या दिल्या होत्या. या अंगठ्यांमध्ये अधिकचे सोने घालून नवीन काम करून आणण्यासाठी फिर्यादीने आरोपीवर विश्वास टाकला होता.

​आरोपी जयेश खानविलकर याने विश्वासाने घेतलेल्या दोन अंगठ्यांपैकी एक अंगठी एका सोनाराला विकली, तर दुसरी मोठी अंगठी ‘मुथूट फायनान्स’ येथे गहाण ठेवून त्यावर कर्ज उचलले. या दोन्ही ठिकाणांहून मिळालेली रक्कम आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फिर्यादीची फसवणूक केली.

​दि. २० एप्रिल रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिर येथे फिर्यादीने आरोपीला गाठून आपल्या अंगठ्या परत मागितल्या. त्यावेळी आरोपीने अंगठ्या किंवा पैसे देण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर, फिर्यादीची कॉलर पकडून त्यांना जोरात धक्का दिला आणि “जास्त त्रास दिलास तर तुझे हातपाय तोडून तुला संपवून टाकीन” अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

अपहार केलेल्या वस्तूंमध्ये पुष्कराज खडा असलेली १,१०,००० रुपयांची अंगठी व लसण्या खडा असलेली ४५,०००/- रुपयांची अंगठी असा एकूण १,५५,०००/- रुपयांचा ऐवज समाविष्ट आहे.

​याप्रकरणी प्रसाद पोकळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी जयेश खानविलकर विरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३१६(२), ३१८(२), ३१८(४), ११५(२) आणि ३५१(३) नुसार गुन्हा नोंदवला आहे. रत्नागिरी शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.