मंगळवेढा:- मंगळवेढा तालुक्यात सध्या लग्न ठरवून फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी लेंडवे चिंचाळे येथील एका तरुणाला लुटल्याची घटना ताजी असतानाच, आता भोसे (बावची) येथे रत्नागिरी जिल्ह्यातील एका ‘लुटेरी दुल्हन’ने आपल्या पहिल्या पतीला आणि पोटच्या मुलीला लपवून एका निष्पाप तरुणाला लग्नाच्या जाळ्यात ओढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भामट्या टोळीने वर पक्षाकडून १ लाख ५३ हजार रुपये रोख आणि दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण लाटून पोबारा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत काही जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, संशयित आरोपी महिला अश्विनी मारुती धानोळे (रा. देवरुख, ता.संगमेश्वर) हिला पुढे करून पिंटू ऊर्फ नाना कोळेकर, शिवाजी गंगाराम कोळेकर आणि युवराज कांबळे (सर्व रा. रेडी, ता. मंगळवेढा) या एजंटांनी फसवणुकीचे जाळे विणले होते. या एजंटांच्या मध्यस्थीने फिर्यादी तरुणाच्या भोसे येथील राहत्या घरी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:३० च्या शुभमुहूर्तावर हे लग्न पार पडले आणि अक्षता पडल्या. मात्र, हा मुहूर्त वधूपक्षासाठी नवीन आयुष्याची सुरुवात नसून, लुटारू टोळीसाठी कमाईची मोठी सुवर्णसंधी ठरला. लग्न लावून देण्याच्या नावाखाली या आरोपींनी मुलाकडच्या लोकांकडून १ लाख ५३ हजार रुपये रोख आणि मौल्यवान सोन्याचे दागिने आपल्या खिशात कोंबले आणि काही दिवसांतच पोबारा केला.
लग्न झाल्यानंतर नववधूचे आधीच एक लग्न झाले असून तिला एक मुलगी देखील आहे, तसेच पैशांसाठी तिने हा बनाव केल्याचे समोर आल्यानंतर फसवणूक झालेल्या वर पक्षाने तातडीने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून काही संशयितांना ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपी शिवाजी कोळेकर आणि युवराज कांबळे यांचा मंगळवेढा पोलिस सध्या युद्धपातळीवर शोध घेत असून या टोळीने आणखी किती जणांना असे फसवले आहे, याचाही तपास केला जात आहे.









