Thursday, June 4, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीकरांवर ‘एक दिवस आड’ पाणी पुरवठ्याचे संकट

रत्नागिरीकरांवर ‘एक दिवस आड’ पाणी पुरवठ्याचे संकट

शीळ धरणात नीचांकी पाणी साठा; पाऊस लांबल्यास भीषण पाणी टंचाई

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा अत्यंत खालावल्याने शहरासमोर भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. मान्सून लांबल्याने आणि उन्हाचा तडाखा कायम असल्याने धरण परिसरातील पाणी पातळीने नीचांकी पातळी गाठली आहे. उपलब्ध पाणीसाठा पाहता आता शहराला ‘एक दिवस आड’ पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयाची टांगती तलवार नागरिकांवर आहे.

सद्यस्थितीत शीळ धरणात केवळ ०.५८ दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. शहराची पाण्याची दैनंदिन गरज प्रतिदिन १९ ते २० दशलक्ष लिटर इतकी आहे, हे पाहता हा साठा जास्तीत जास्त १५ ते २० दिवस पुरेल इतकाच आहे. सध्या आठवड्यातून एकदा पाणीकपात करून परिस्थिती हाताळली जात असली, तरी पाऊस लांबल्यास हे नियोजन अपुरे पडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

परिस्थिती हाताळण्यासाठी पालिका प्रशासनाकडून आता पाणीबचतीसाठी ‘एक दिवस आड’ पाणी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. या नियोजनानुसार शहराचे दोन भाग करून, आलटून-पालटून पाणीपुरवठा केला जाणार आहे. जर परिस्थिती अधिकच गंभीर झाली, तर धरणातील ०.५० दशलक्ष घनमीटर मृत साठा वापरण्याचा नाईलाज प्रशासनाला करावा लागू शकतो. मात्र, या पाण्याची गुणवत्ता वेगळी असल्याने हा निर्णय अत्यंत शेवटचा पर्याय म्हणून ठेवण्यात आला आहे.

पाणी पुरवठा समितीचे सभापती निमेश नायर यांनी या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी प्रत्यक्ष धरणावर जाऊन पाहणी केली असून, पाणीपुरवठ्याचे संकट टाळण्यासाठी ते संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा करत आहेत. पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने, रत्नागिरीकर नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.