Saturday, October 17, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मुरुगवाडा येथे गोवा बनावटीच्या दारूचा बेकायदेशीर साठा जप्त

मुरुगवाडा येथे गोवा बनावटीच्या दारूचा बेकायदेशीर साठा जप्त

६० वर्षीय इसम पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर परिसरात सुरू असलेल्या गस्तीदरम्यान शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एक मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूचा अवैध साठा जप्त केला आहे. मुरुगवाडा दांडा फिशरीजच्या मागे, वरचीवाडी परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत ६० वर्षीय इसमाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून सुमारे २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक नेहमीप्रमाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान त्यांना मुरुगवाडा दांडा फिशरीजच्या मागे, वरचीवाडी येथे एका व्यक्तीने बेकायदेशीरपणे विक्रीसाठी गोवा बनावटीच्या विविध ब्रँडची दारू स्वतःच्या ताब्यात बाळगल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.

या प्रकरणी प्रशांत शिवराम नागवेकर (वय ६०, रा. मुरुगवाडा, भैरी मंदिराच्या मागे, रत्नागिरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित इसमाचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून विविध ब्रँडच्या गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त करण्यात आला असून, जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची बाजारातील किंमत २८ हजार ७१२ रुपये इतकी आहे.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अरांक्षा यादव (भा.पो.से.), परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, सहायक पोलीस फौजदार दीपक साळवी, पोलीस हवालदार शांताराम झोरे, अमोल भोसले, भालचंद्र मयेकर, पोलीस कॉन्स्टेबल अमित पालवे आणि निलेश शिंगवे यांनी सहभाग घेतला होता.

या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९५१ च्या कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलिसांकडून सुरू आहे. शहरात अशा प्रकारे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाकडून यापुढेही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.