सात जण अटकेत
रत्नागिरी:- शहरातील मिरजोळे-एमआयडीसी परिसरातील नाचणकर चाळ येथे दुचाकीच्या स्टॅण्डच्या वेल्डिंगच्या कामावरून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी झाले असून पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही घटना रविवारी (ता. २१) सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान नाचणकर वर्कशॉप, नाचणकर चाळ, एमआयडीसी-मिरजोळे येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनार रायबा पाटील (वय ३८, रा. पाटीलवाडी, मिरजोळे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दुचाकीचा स्टॅण्ड वेल्डिंगसाठी त्यांनी नाचणकर वर्कशॉपमध्ये दिला होता. काम समाधानकारक न झाल्याने ते पुन्हा वर्कशॉपमध्ये जाऊन संबंधित मेस्त्रीला याबाबत जाब विचारला. त्यावरून वाद निर्माण झाला. रागाच्या भरात संदीप उर्फ बावा नाचणकर, नाना नाचणकर, अर्थव नाचणकर, मंथन नाचणकर, गोट्या नाचणकर, सौरभ नाचणकर, ओमकार अरुण नाचणकर, चिंतन नाचणकर, प्रतिक नाचणकर, सोहन नाचणकर व इतर सुमारे २५ जणांनी एकत्र येत त्यांना लाकडी फळीने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या हाणामारीत मिनार पाटील यांची सोन्याची चेन गहाळ झाली. तसेच त्यांना घेण्यासाठी आलेल्या नातेवाइकांच्या मोटारीची काच लोखंडी रॉडने फोडण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या घटनेत मिनार पाटील, तुषार पाटील आणि दिनेश पाटील जखमी झाले.
दरम्यान, प्रतिक संतोष नाचणकर (वय २४, रा. नाचणकर चाळ, मिरजोळे) यांनी दिलेल्या प्रतितक्रारीत वेगळाच घटनाक्रम नमूद केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, वर्कशॉपमध्ये काही व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत येऊन शिवीगाळ करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते तेथे गेले असता मिनार पाटील यांनी त्यांच्याशी वाद घालून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर झालेल्या झटापटीत प्रतिक नाचणकर यांनी लाकडी फळीने मिनार पाटील यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर मिनार पाटील यांनी त्यांच्या नातेवाइकांना बोलावून घेतले. काही वेळातच समर्थ पाटील, धीरज पाटील, तुषार पाटील, दिनेश पाटील, मयुरेश पाटील, वैभव पाटील, क्रिश पाटील, साहिल पाटील, गौरेश पाटील, विशाल पाटील, अभिषेक पाटील, मिनार पाटील व इतर सुमारे २२ जण तेथे आले. त्यांनी चाकूने भोसकण्याची धमकी देत लाकडी फळ्या व लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप प्रतितक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेत सौरभ अनिल नाचणकर, सोहन अनिल नाचणकर आणि प्रतिक संतोष नाचणकर जखमी झाले. दोन्ही पक्षांच्या तक्रारींवरून शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. पुढील तपास शहर पोलिस करत आहेत.









