Thursday, October 8, 2026
spot_img
Home राजापूर मासे विक्रेत्या सहा महिलांवर गुन्हा दाखल

मासे विक्रेत्या सहा महिलांवर गुन्हा दाखल

राजापूर शहरात पोलीसांची कारवाई

राजापूर:- राजापूर शहरातील सार्वजनिक रस्त्यावर नियमबाह्यरीत्या मासळी विक्री करून दुर्गंधी पसरवणाऱ्या नाटे येथील सहा महिलांवर राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता पथकाने मंगळवारी सकाळी ही कारवाई केली.

शहरातील शिवाजी पथ ते मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या मार्गावर महालक्ष्मी हॉटेलसमोर काही महिला रस्त्यावरच मासे विक्री करत असल्याच्या तक्रारी नगर परिषद प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक अमित मोहन पोवार, स्वच्छता मुकादम राजन रामचंद्र जाधव आणि सफाई कर्मचारी संदेश नाना जाधव हे संयुक्त पथक संबंधित ठिकाणी पाहणीसाठी गेले. त्या वेळी रस्त्यावर अनधिकृतपणे मासळी विक्री सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

संबंधित महिला रस्त्यावरच माशांची खवले आणि घाण पाणी टाकत असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती, तसेच पादचाऱ्यांना ये-जा करणे अवघड झाले होते. सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणल्याप्रकरणी नगर परिषदेचे मुकादम राजन जाधव यांनी राजापूर पोलिसांत फिर्याद नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी सादिका फणसोपकर, शाहिन फणसोपकर, अक्सा समीर सोलकर, नाजिया वाडकर, अनिसा रशिद सोलकर आणि सुमय्या बोरकर (सर्व रा. नाटे, ता. राजापूर) यांच्याविरोधात महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम २६७, २६९ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.