Monday, September 28, 2026
spot_img
Home राजापूर महावितरणच्या तुटलेल्या विजवाहिनीचा शॉक लागून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

महावितरणच्या तुटलेल्या विजवाहिनीचा शॉक लागून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

पाचल:- शेतात गुरे चरायला गेलेल्या एका गरीब शेतकऱ्याचा महावितरणच्या जमिनीवर लोंबकळणाऱ्या विद्युत प्रवाहित विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने जागीच तडफडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना राजापूर तालुक्यातील आजिवली येथे घडली आहे. जयवंत सिताराम राणे (वय ४७, रा. आजिवली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी पाच ते साडेसहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.

या घटनेनंतर महावितरणच्या विरोधात तीव्र संताप पसरला असून राणे यांच्या दुदैवी मृत्युमुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार हिरावल्याने संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. जोपर्यंत महावितरण कंपनी किंवा शासन स्तरावरून तातडीने आर्थिक मदत जाहीर केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवू देणार नाही, असा ठाम पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र राजापूर पोलीस निरीक्षक अमित यावद, रायपाटण दुरक्षेत्राचे प्रमुख दत्ताराम बाणे यांसह महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजुत काढत मदतीचे आश्वासन दिल्याने तणाव निवळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयवंत राणे हे सायंकाळी गावातील शिवारात गुरे चारण्यासाठी गेले होते. याचवेळी गवतात पडलेल्या महावितरणच्या विद्युत वाहिनीचा त्यांना जोरदार धक्का बसला व ते खाली कोसळले. या घटनेची माहिती मिळताच अजिवली गावचे सरपंच संजय राणे यांच्यासह ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी जयवंत यांना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. तांदळे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेनंतर सरपंच संजय राणे यांनी पाचल येथील महावितरण कार्यालयाशी तत्काळ संपर्क साधून घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. परंतु, एवढी मोठी दुर्घटना घडूनही रात्री पावणेदहा वाजेपर्यंत पाचल अथवा राजापूर कार्यालयातील एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही. त्यामुळे स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे प्रमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बाणे, रामदास पाटील, पोलीस अंमलदार कोळी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.

मृत जयवंत राणे हे अत्यंत गरीब कुटुंबातील असून शेती हाच त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेचा मुख्य आधार होता. त्यांच्या निधनाने घरातील कर्ता पुरुष गमावल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे महावितरण वा शासनाने ठोस आर्थिक भरपाई जाहीर करावी, अन्यथा शवविच्छेदन करू दिले जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी लावून धरला. अखेर रात्री पावणेदहा वाजल्यानंतर महावितरणचे राजापूर उपकार्यकारी अभियंता मंगेश क्षीरसागर यांनी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलीस अधिकारी व महावितरण अधिकारी यांनी स्थानिकांशी तसेच राणे कुटुंबीयांशी चर्चा केली व मदतीचे आश्वासन दिले. अखेर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.