Wednesday, May 6, 2026
spot_img
Home दापोली मासेमारी बोटीवर काम करताना हृदयविकाराचा झटक्याने खलाशाचा मृत्यू

मासेमारी बोटीवर काम करताना हृदयविकाराचा झटक्याने खलाशाचा मृत्यू

दापोली:- हर्णे बंदरातील एका मच्छिमारी बोटीवर काम करणाऱ्या खलाशाचा समुद्रात काम करत असताना अचानक छातीत दुखू लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रामराज चंद्रबली राजभर (वय ५६, मूळ रा. गाजीपूर, उत्तर प्रदेश) असे मृत खलाशाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत रामराज राजभर हे गेल्या ८ ते ९ वर्षांपासून हर्णे येथील पांडुरंग मनोहर चोगले यांच्या मालकीच्या मच्छिमारी बोटीवर खलाशी म्हणून कार्यरत होते. शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी दुपारी २:३० वाजताच्या सुमारास समुद्रामध्ये बोटीवर काम सुरू असताना राजभर यांच्या छातीत अचानक तीव्र कळा येऊ लागल्या.

बोटीवरील तांडेल जंवत गोपाळ चोगले यांनी तातडीने मालकांशी संपर्क साधला आणि बोट हर्णे बंदराकडे वळवली. हर्णे बंदरात पोहोचल्यानंतर बोट मालकांनी राजभर यांना तातडीने स्थानिक डॉ. दळवी यांच्या रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी हलवण्यास सांगितले.

राजभर यांना तात्काळ खासगी रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे नेण्यात आले. मात्र, रात्री ९:०६ वाजताच्या सुमारास तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दापोली उपजिल्हा रुग्णालयाने दिलेल्या एम.एल.सी. अहवालावरून दापोली पोलिसांनी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. एका जुन्या आणि अनुभवी कामगाराच्या अशा अचानक जाण्याने हर्णे बंदर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.