Sunday, September 13, 2026
spot_img
Home खेड महिलेच्या विनयभंग प्रकरणात न्यायालयाकडून दोघांची निर्दोष मुक्तता

महिलेच्या विनयभंग प्रकरणात न्यायालयाकडून दोघांची निर्दोष मुक्तता

खेड:- मालमत्तेच्या जुन्या वादातून वहिनीने दीर आणि पुतण्या यांच्यावर लावलेल्या विनयभंग, शिवीगाळ व मारहाणीच्या गंभीर आरोपातून खेड येथील मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश निरगुडे यांनी हा निकाल दिला. या खटल्यात न्यायालयाने संजय घोले (दीर) आणि विश्वतेज घोले (पुतण्या) यांची मुक्तता केली.

भरणे गवळवाडी (ता. खेड) येथे राहणाऱ्या संबंधित महिलेचा आपल्या दीर आणि पुतण्यासोबत मालमत्तेवरून जुना वाद सुरू होता. याच वादाचा राग मनात धरून तिने या दोघांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात विनयभंग आणि मारहाण केल्याची फिर्याद दिली होती. खेड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक केंद्रे यांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७६, ७९, १३१ व इतर कलमांन्वये गुन्हा नोंदवला होता.

​खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षाच्या वतीने एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, आरोपींच्या वतीने अ‍ॅड. संगिता विजय बापट आणि अ‍ॅड. प्रितेश संदेश जाधव यांनी न्यायालयात बाजू मांडली.

सुनावणी दरम्यान साक्षीदार आणि फिर्यादी महिला यांच्या जबाबांमध्ये मोठ्या प्रमाणावर विसंगती आढळून आली. तसेच, घडलेल्या कथित घटनेनंतर पोलिसांत फिर्याद देण्यास झालेला विलंब संशयास्पद ठरला.

​बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. संगिता बापट व अ‍ॅड. प्रितेश जाधव यांनी केलेला सखोल कायदेशीर आणि तार्किक युक्तिवाद न्यायालयाने पूर्णपणे ग्राह्य धरला. मालमत्तेच्या वादातून हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने, मा. जिल्हा न्यायाधीश निरगुडे यांनी आरोपी संजय घोले व विश्वतेज घोले यांची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.