Sunday, October 4, 2026
spot_img
Home रत्नागिरी महानगर गॅसच्या नावाखाली फसवणूुकीचे प्रकार वाढले

महानगर गॅसच्या नावाखाली फसवणूुकीचे प्रकार वाढले

पोलिस प्रशासनाकडून दक्ष राहण्याच्या सूचना

रत्नागिरी:- सध्या ‘महानगर गॅस’चे कनेक्शन आज रात्रीच खंडित होणार असल्याची खोटी भीती दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात या संदर्भातील तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नागरिकांना अत्यंत दक्ष राहण्याचा इशारा दिला आहे.

सायबर गुन्हेगार नागरिकांना बनावट मेसेज किंवा फोन कॉल करून संपर्क साधत आहेत. गॅस बिल त्वरित अपडेट करा, केवायसी पूर्ण करा अथवा गॅस वितरण ॲप डाऊनलोड करा, अन्यथा कनेक्शन बंद होईल, अशी भीती या संदेशांमध्ये दाखवली जाते. घाबरलेल्या नागरिकांना व्हॉट्सॲपवरून संशयास्पद एपीके फाईल डाऊनलोड करण्यास भाग पाडले जाते किंवा AnyDesk, TeamViewer सारखी रिमोट ॲक्सेस ॲप्स इन्स्टॉल करायला लावून त्यांच्या बँक खात्याची माहिती, यूपीआय पिन आणि ओटीपी चोरून खात्यातील रक्कम परस्पर लंपास केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

कोणत्याही गॅस कंपनीकडून ग्राहकांना अशा प्रकारे वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून संदेश पाठवून थेट पैसे भरण्यास किंवा एपीके फाईल डाऊनलोड करण्यास सांगितले जात नाही, असे स्पष्ट करत पोलिसांनी नागरिकांना सावध केले आहे. ग्राहकांनी केवळ अधिकृत ॲप व संकेतस्थळाचाच वापर करावा, कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये अथवा आपले बँकिंग डिटेल्स आणि ओटीपी कोणाशीही शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तात्काळ ‘१९३०’ या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा ‘www.cybercrime.gov.in’ या अधिकृत पोर्टलवर त्वरित तक्रार नोंदवावी, असे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे सांगण्यात आले आहे.