Tuesday, June 9, 2026
spot_img
Home रत्नागिरी कोळंबे येथे दुचाकीवरुन पडल्याने महिलेचा मृत्यू

कोळंबे येथे दुचाकीवरुन पडल्याने महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी-कोळंबे मार्गावर दुचाकीवरून पडल्याने एका ४८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पतीच्या बेदरकार वाहन चालवण्यामुळे ही घटना घडल्याचे निष्पन्न झाले असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ मे रोजी दुपारी १:१५ च्या सुमारास संतोष सूर्यकांत लाखण (वय ५४, रा. मानखुर्द, मुंबई) हे आपली पत्नी विद्या संतोष लाखण (वय ४८) यांना दुचाकीवर (एम.एच. ०८ बी.एम. ००४७) बसवून कोळंबे येथील त्रिमुखीदेवीच्या मंदिरात ओटी भरण्यासाठी जात होते. रत्नागिरी-कोळंबे मार्गावर फणसोप येथील लक्ष्मी केशव सर्विसिंग सेंटरजवळ आले असता, संतोष लाखण यांनी रस्त्याची परिस्थिती न पाहता अतिशय हयगयीने व बेदरकारपणे वाहन चालवले.

दुचाकी गतिरोधकावर असताना त्यांनी अचानक ब्रेक दाबल्याने मागे बसलेल्या विद्या लाखण यांचा तोल गेला आणि त्या रस्त्यावर जोरात आदळल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना तत्काळ रत्नागिरीच्या सिव्हील हॉस्पिटलमधील आयसीयू विभागात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ प्रमोद तुकाराम कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी संतोष लाखण याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.