भालावली येथे भरदिवसा घरफोडी

१ लाख ७० हजारांची सोन्याची चैन लंपास

राजापूर:- राजापूर तालुक्यातील भालावली, वरचा भंडारवाडा येथे एका बंद घराचे कडी-कोयंडा उघडून अज्ञात चोरट्याने १ लाख ७० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​फिर्यादी विश्वास महादेव भोसले (वय ६९ वर्षे, रा. भालावली वरचा भंडारवाडा) हे १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास आपल्या घराला कडी लावून बाहेर गेले होते. दरम्यान, १ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत चोरट्याने संधी साधून घराचे कुलूप किंवा कडी उघडून आत प्रवेश केला.

घरात शिरलेल्या चोरट्याने लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील १ लाख ७० हजार रुपये किमतीची, सुमारे १.१७ मिली ग्रॅम वजनाची सोन्याची चपटी चैन लंपास केली. १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास भोसले घरी परतले असता हा चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.

​विश्वास भोसले यांनी २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १६/२०२६ नुसार दाखल केला आहे.