फसवणुकीचा गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील एका व्यावसायिकाची साडेसहा लाख रुपये किमतीची कार भाड्याने नेऊन ती परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप एकनाथ चव्हाण (वय ४३, रा. प्रभानवली-खैरवाडी, ता. लांजा) यांच्या मालकीची पांढऱ्या रंगाची हुंदाई कंपनीची ऑरा गाडी (क्र. MH-08-BE-0466) आहे. संशयित आरोपी तन्मय चंद्रकांत पाटील ऊर्फ गंगावणे (रा. चाफवली, ता. संगमेश्वर) हा या गाडीवर चालक म्हणून काम करत होता.
दिनांक २६ एप्रिल रोजी तन्मय हा गाडी भाड्याने (ट्रीपवर) घेऊन जातो असे सांगून निघाला. मात्र, त्यानंतर तो गाडी घेऊन पुन्हा परतलाच नाही. फिर्यादी यांनी त्याच्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने गाडी कुठे आहे याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
फिर्यादी यांनी गाडीचा शोध सुरू केला असता, २८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ही गाडी रत्नागिरी तालुक्यातील वळके धनगरवाडी येथे असल्याचे समजले. मात्र, फिर्यादी त्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच आरोपी गाडीसह तेथून पसार झाला होता. बराच शोध घेऊनही गाडी आणि चालक मिळून न आल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चव्हाण यांनी पोलिसांत धाव घेतली.
याप्रकरणी संदीप चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रत्नागिरी शहर पोलिसांनी आरोपी तन्मय चंद्रकांत पाटील ऊर्फ गंगावणे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६(२) (फसवणूक) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अंदाजे ६,५०,००० रुपये किमतीची ही कार असून पोलीस अधिक तपास करत आहेत.









