गुहागर:- गुहागर-चिपळूण मार्गावर विश्रामगृहाच्या समोर भरधाव ॲक्सिस दुचाकीने समोरून येणाऱ्या इको गाडीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १४ जून रोजी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत संजय वसंत कानसरे (वय ४७, रा. वरचा पाट, दुर्गादेवीवाडी, गुहागर) हे १४ जून रोजी रात्री आपली ॲक्सिस दुचाकी (क्र. एमएच/०८/एएस/२०८६) घेऊन शृंगारतळीकडून गुहागरच्या दिशेने जात होते. गुहागर कोर्टालगत असलेल्या विश्रामगृहाजवळ पोहोचले असता, चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले.
संजय कानसरे यांनी आपली दुचाकी भरधाव, बेदरकारपणे आणि हयगयीने चालवत स्वतःची बाजू सोडून रस्त्याच्या विरुद्ध बाजूला नेली. तिथे गुहागरकडून येणाऱ्या मारुती सुझुकी इको गाडीला (क्र. एमएच/०८/एएन/४५४२) जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार थेट रस्त्यावर पडले. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच गुहागर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ लुकमान सुजात तडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात स्वतःच्या हयगयीमुळे मयत झालेल्या संजय कानसरे यांच्याविरुद्ध गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.









