Thursday, June 18, 2026
spot_img
Home गुहागर गुहागर कोर्टासमोर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा उपचारापूर्वीच मृत्यू

गुहागर कोर्टासमोर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा उपचारापूर्वीच मृत्यू

गुहागर:- चिपळूण-गुहागर मार्गावर गुहागर न्यायालयासमोर झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संजय वसंत कानसरे (वय ४५, रा. वरचापाट, दुर्गादेवीवाडी, गुहागर) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संजय कानसरे हे १४ जून रोजी सायंकाळी आपल्या मालकीची सुझुकी ॲक्सेस (MH-०८, ए.एस.-२०८६) गाडीवरून शृंगारतळीकडून गुहागरच्या दिशेने जात होते. दरम्यान, गुहागर न्यायालयासमोर त्यांची दुचाकी आणि एका इको कारमध्ये जोराची धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की संजय कानसरे गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर त्यांचे भाऊ दीपक वसंत कानसरे यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात पोहोचताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, संजय कानसरे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

​याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू (आमृ.) क्रमांक २४/२०२६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, बी.एन.एस.एस १९४ नुसार पुढील कार्यवाही सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण काय आणि इको कारचा चालक कोण, याचा तपास गुहागर पोलीस करत आहेत.