लांजा केळंबे विभुते स्टॉप जवळील घटना
लांजा:- तालुक्यातील केळंबे विभुते स्टॉपजवळ भरधाव एसटी बसने धडक दिल्याने रिक्षाचालक आणि त्याच्या कुटुंबातील तीन सदस्य गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात एसटी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक १८ जुलै रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून, यासंदर्भातील गुन्हा दिनांक २३ जुलै रोजी सायंकाळी ४:२३ वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी चालक विश्वास कनावजे हा आपली एसटी बस (क्रमांक एम.एच. १२ / बी.टी. २६६७) ही देवरुख-साखरपा-कोर्ले मार्गे लांजा अशी चालवून नेत होता. दरम्यान, केळंबे विभुते स्टॉपजवळ आला असता, त्याने रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता एसटी बस अत्यंत हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगाने चालवली. याचवेळी लांजा ते विवली दिशेने जाणारे रिक्षाचालक प्रशांत वाघधरे यांच्या रिक्षाला (क्रमांक एम.एच. ०८ / एक्यु-१८९०) समोरून जोरदार धडक देऊन हा अपघात घडवण्यात आला.
या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून रिक्षाचालक आणि त्यांच्या कुटुंबातील प्रशांत नारायण वाघधरे (वय ६५ वर्षे), सौ. पल्लवी प्रशांत वाघधरे (वय ६० वर्षे), पार्थ पारीतोष वाघधरे (वय २ वर्षे) (सर्व रा. लांजा वैभव वसाहत, ता. लांजा, जि. रत्नागिरी) हे तिघेजण सदस्य जखमी झाले आहेत.
लांजा पोलीस ठाणे मोटार अपघात रजिस्टर नंबर ०९/२०२६ वरून प्राप्त कागदपत्रांच्या आधारे उशिरा सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लांजा पोलीस करीत आहेत.









