Tuesday, November 10, 2026
spot_img
Home गुन्हेगारी बनावट नोटा देऊन सराफाची फसवणूक

बनावट नोटा देऊन सराफाची फसवणूक

खेड:- खेड तालुक्यातील लोटे घाणेखुंट येथे दोन भामट्यांनी बनावट नोटांचे बंडल देऊन सराफाची तब्बल दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना सोमवार ९ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. तीन लाख रुपये असल्याचे भासवून पाचशे रुपयांच्या बनावट नोटांची बंडले दुकानात ठेवत दोन सोन्याच्या चेन घेऊन संशयितांनी पोबारा केला. पैसे बनावट असल्याचे लक्षात येताच सराफाला आपली फसवणूक झाल्याचे समजले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत संतोष आदावडे (रा. सोनगाव-माठवाडी, खेड) यांनी माहिती दिली. त्यांचे मुंबई-गोवा महामार्गालगत लोटे घाणेखुंट बसथांब्याशेजारी ‘सोनल ज्वेलर्स’ नावाचे दागिन्यांचे दुकान आहे. सोमवारी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास दोन तरुण त्यांच्या दुकानात आले. आम्हाला दोन सोन्याच्या चेन घ्यायच्या आहेत, असे सांगून त्यांनी दागिने पाहण्यास सुरुवात केली.
आदावडे यांनी त्यांना काही चेन दाखवल्या. त्यातील एक चेन मित्राला दाखवून येतो, असे सांगत एक तरुण दुकानाबाहेर गेला. काही वेळाने तो पुन्हा दुकानात आला. त्यानंतर त्याच्यासोबत आणखी एक तरुण आला. दोघांनी दोन चेन घेण्याचे सांगितले. याचवेळी त्यांनी कॅरीबॅगमधून पाचशे रुपयांच्या सहा बंडलांचा गठ्ठा काउंटरवर ठेवला. ‘हे तीन लाख रुपये आहेत. तुम्ही पैसे इथेच ठेवा, मी मित्राला चेन दाखवून येतो,’ असे सांगून त्यांनी आदावडे यांचा विश्वास संपादन केला.
दरम्यान, आदावडे यांचा भाचा दुकानाच्या दरवाजाजवळ उभा राहून संशयितांवर लक्ष ठेवून होता. मात्र, दोन्ही तरुण महामार्गावर उभी केलेल्या चारचाकी गाडीत बसून मुंबईच्या दिशेने पसार झाले. त्यांच्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न भाच्याने केला; मात्र गाडीला नंबर प्लेट नसल्याने वाहनाचा क्रमांक मिळू शकला नाही.
काही वेळाने काउंटरवर ठेवलेल्या नोटा बनावट असल्याचे लक्षात येताच आदावडे यांना फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी लोटे पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
महामार्गालगत असलेल्या सोनल ज्वेलर्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलिसांच्या तपासात अडथळा निर्माण झाला आहे. ज्या कॉम्प्लेक्समध्ये हे दुकान आहे, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत; मात्र त्यामध्ये कार्ड नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे संशयितांचे फुटेज उपलब्ध होऊ शकलेले नाही. गाडीला नंबर प्लेट नसणे आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसणे यामुळे संशयितांचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे.