Monday, June 29, 2026
spot_img
Home गुन्हेगारी फॅक्टरी मॅनेजरनेच हडपली मालकाची ५२ एकर जमीन अन् मागितली २५ लाखांची खंडणी

फॅक्टरी मॅनेजरनेच हडपली मालकाची ५२ एकर जमीन अन् मागितली २५ लाखांची खंडणी

मंडणगड:- गेल्या १५ वर्षांपासून विश्वासाने सोबत असलेल्या फॅक्टरी मॅनेजरने आणि त्याच्या मुलाने मिळून आपल्याच मालकाची तब्बल ५२ एकर जमीन हडपल्याचा धक्कादायक प्रकार बामणघर (ता. मंडणगड) येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी सुमारे ४२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, आरोपींनी उलट फिर्यादीकडेच २५ लाखांची खंडणी मागून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

​विलेपार्ले (मुंबई) येथील रहिवासी आणि व्यापारी महेश रामनिरंजन चामरिया (वय ६७) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. आरोपी सुनील दत्तात्रय दरिपकर (रा. घनसोली, नवी मुंबई) हे चामरिया यांच्याकडे मागील १५ वर्षांपासून फॅक्टरी मॅनेजर म्हणून कामाला होते. तर त्यांचा मुलगा समीप सुनील दरिपकर हा दापोली आणि मंडणगड परिसरातील जमीन खरेदीचे व्यवहार पाहत होता. चामरिया यांनी समीप याला जमीन खरेदी करण्यासाठी ‘कुळ मुखत्यारपत्र’ दिले होते.

​या विश्वासाचा गैरफायदा घेत, २०१४ ते २०२५ या कालावधीत आरोपींनी चामरिया यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या जमिनी त्यांच्या नावावर न करता, परस्पर स्वतःच्या आणि वडिलांच्या नावावर करून घेतल्या. मुखत्यारपत्राचा वापर करून त्यांनी सुमारे ५१ लाख ९१ हजार ६०० रुपये किमतीची ५२ एकर जमीन हडपली.

​या व्यवहाराबाबत जेव्हा फिर्यादी चामरिया यांनी आरोपींकडे जाब विचारला, तेव्हा आरोपींनी त्यांना २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. ही रक्कम न दिल्यास “तुला ठार मारून टाकू” अशी धमकीही दिली. या छळाला कंटाळून अखेर चामरिया यांनी मंडणगड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाद मागितली.

​न्यायालयाच्या आदेशानंतर, मंडणगड पोलीस ठाण्यात आरोपी समीप दरिपकर आणि सुनील दरिपकर यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३१६(२), ३१८(४), ३३६(३), ३३८ आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या जमीन घोटाळ्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.