Saturday, May 16, 2026
spot_img
Home गुन्हेगारी पोल्ट्रीच्या तक्रारीवरून वृद्धेवर जीवघेणा हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल

पोल्ट्रीच्या तक्रारीवरून वृद्धेवर जीवघेणा हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल

चिपळूण:- पोल्ट्री फार्मच्या तक्रारीचा राग मनात धरून एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील कापसाळ मधलीवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पूजा राजेंद्र कडवईकर (वय ६५) यांनी त्यांच्या घराशेजारी असलेल्या आरोपींच्या पोल्ट्री फार्मबाबत तक्रार केली होती. याच कारणावरून दि. १४ मे रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास आरोपींनी फिर्यादी यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपी संदेश हरिश्चंद्र साळवी याने घरातील कौल उचलून पूजा कडवईकर यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर जोरात मारून त्यांना दुखापत केली. तसेच, त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली. मारहाणीचा व्हिडिओ किंवा पुरावा राहू नये या उद्देशाने आरोपी साधना बळीराम साळवी आणि दीपाली बळीराम साळवी यांनी फिर्यादीच्या मुलाचा मानस कडवईकर यांच्याकडील मोबाईल हिसकावून फेकून दिला आणि नुकसान केले. या दरम्यान आरोपी मधुकर सदाशिव साळवी याने फिर्यादीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

या घटनेनंतर पूजा कडवईकर यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी संदेश हरिश्चंद्र साळवी, साधना बळीराम साळवी, दीपाली बळीराम साळवी, मधुकर सदाशिव साळवी या चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ११८ (१), २३८ (क), ३५२, आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.