व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे विश्वास संपादन
रत्नागिरी:- पोलिस अधिकारी असल्याचे भासवून अनोळखी व्यक्तीने लांजा तालुक्यातील ७८ वर्षीय महिलेला तब्बल ६० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून महिलेचा आधारकार्डचा वापर करत कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आले. त्यानंतर विविध संघटनांकडून जमा केलेली रक्कम या खात्यात वळवून त्यातील दहा टक्के कमिशन महिलेला देण्याचे आमिष दाखवण्यात आले. मात्र, या प्रकरणात महिलेची ६० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास या महिलेच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीने संपर्क साधला. आपण नाशिक येथील पंचवटी पोलिस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगत त्याने पोलिस अधिकारी असल्याचे भासवले. संशयिताने ‘सुशांत पिसे’ असे नाव सांगितले. त्यानंतर व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करून महिलेचा विश्वास संपादन केला. या प्रक्रियेदरम्यान संशयिताने महिलेच्या आधारकार्डचा वापर करून मुंबई येथील कॅनरा बँकेत खाते उघडले. या खात्यामध्ये अब्दुल रहमान नावाच्या व्यक्तीमार्फत विविध संघटनांकडून जमा होणारी रक्कम महिलेच्या नावे जमा केली जात असल्याचे सांगण्यात आले. त्याबदल्यात जमा रकमेच्या दहा टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर महिलेच्या एसबीआय बँक खात्यामधून आरटीजीएसद्वारे पुणे येथील पूनित ट्रेडर्स या नावाने असलेल्या बँक ऑफ इंडिया खात्यात पैसे भरण्यास सांगण्यात आले. पैसे न भरल्यास अटक करण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. या प्रकारातून महिलेची एकूण ६० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी शनिवारी (ता. ७) नोव्हेंबर सायंकाळी सहाच्या सुमारास सायबर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताने पोलिस अधिकारी असल्याचे भासवून केलेल्या या फसवणुकीचा पोलिस तपास करीत आहेत.









