Friday, May 29, 2026
spot_img
Home चिपळूण परशुराम घाटात केमिकलचा टँकर उलटून अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

परशुराम घाटात केमिकलचा टँकर उलटून अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या परशुराम घाटात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. रसायनाने (केमिकल) भरलेला एक भरधाव टँकर घाटातून खाली उतरत असताना अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. नियंत्रण सुटल्याने हा टँकर उलटून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात टँकर चालकाचा गाडीखाली चिरडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील परशुराम घाटातून हा टँकर चिपळूणच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, टँकर पलटी झाल्यानंतर चालक गाडीच्या केबिनखाली पूर्णपणे दावला गेला आणि त्याचा जागीच प्राण गेला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि चिपळूण नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्याचे आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.

या भीषण अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती, ज्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक संथ गतीने पूर्ववत केली. परशुराम घाटातील या थरारक अपघातामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.