Saturday, May 2, 2026
spot_img
Home गुन्हेगारी परदेशातील नोकरीचे आमिष दाखवून ५० लाखांची फसवणूक; रत्नागिरीतील दोन भावांवर गुन्हा दाखल

परदेशातील नोकरीचे आमिष दाखवून ५० लाखांची फसवणूक; रत्नागिरीतील दोन भावांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- परदेशात नोकरीला लावण्याचे आणि कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून दिल्लीतील एका व्यक्तीची ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात दोन संशयित आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सज्जाद अहमद खान (वय ५४, रा. नवी दिल्ली) यांना आरोपींनी परदेशात कामगार पाठवून मोठे कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. आरोपींचा विश्वास धरून खान यांनी एकूण ५६ व्यक्तींना परदेशात नोकरीला लावण्यासाठी प्रत्येकी ८५,००० रुपये याप्रमाणे एकूण ५० लाख रुपये गोळा केले. ही रक्कम त्यांनी आरोपींना मिरजोळे, रत्नागिरी येथील त्यांच्या निवासस्थानी रोख स्वरूपात दिली होती.

​आरोपींनी या ५६ कामगारांना नियोजित देशात किंवा कामावर न पाठवता दुसऱ्याच ठिकाणी पाठवले. त्यामुळे या कामगारांची मोठी गैरसोय झाली. अखेर फिर्यादी सज्जाद खान यांना या सर्व ५६ जणांना स्वतःच्या खर्चाने पुन्हा भारतात परत आणावे लागले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खान यांनी रत्नागिरी गाठून पोलिसांत धाव घेतली.

या प्रकरणात पोलिसांनी खालील दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. इसाम इरफान जांभारकर आणि अस्लम इरफान जांभारकर (दोन्ही राहणार: प्लॅट नं. सी/२३९, एम.आय.डी.सी. मिरजोळे, फिनोलेक्स कॉलेजजवळ, रत्नागिरी) अशी दोघांची नावे आहेत. फसवणुकीची ही घटना १ जुलै २०२५ ते १ मे २०२६ दरम्यान घडली. बुधवार १ मे २०२६ रोजी सायंकाळी ७.२० वाजता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१६ (२), ३१८ (२) आणि ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, परदेशात नोकरीला लावणाऱ्या अशा रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.