रत्नागिरी:- राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकरची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. वैद्यकीय कारणास्तव आंबेरकरला ६ आठवडयांचा अल्पकालीन जामीन रत्नागिरी सत्र न्यायालयाकडून मंजूर झाला होता. जामीनाचा कालावधी संपल्याने आंबेरकर पुन्हा एकदा न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
राजापुर तालुक्यातील कशेळी येथील पत्रकार शशिकांत वारिशे याच्या थार गाडीखाली चिरडून खून केल्याप्रकरणी पंढरीनाथ अबिरकर याच्याविरुद्ध भादवि कलम ३०२ नुसार राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच ७ फेब्रुवारी २०२३ रोजी पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली होती. आंबेरकर याने न्यायालयात एकूण तीन वेळा जामीन अर्ज दाखल केले असून ते सर्व अर्ज फेटाळण्यात आले होते. वैद्यकीय कारणास्तव आंबेरकर याच्याकडून जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाने जामीन देताना म्हटले होते की, आंबेरकर याच्याविरुद्ध आरोप गंभीर स्वरुपाचा आहे. अर्जदाराची राजकीय पार्श्वभूमी आहे व खटला अर्धवट सुरू आहे. आरोपी देखील माणूस आहे हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. वैद्यकीय कारणांवरून गंभीर गुन्ह्यातही जामीन देण्यात आल्याचे न्यायनिवाडे सादर करण्यात आले आहेत त्यामुळे कठोर अटी घालून आरोपीस सहा आठवछ्यांचा अल्पकालीन जामीन देणे योग्य ठरेल, असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले होते.
आंबेरकर याच्याविरुद्धचा खटला रत्नागिरी सत्र न्यायालयापुढे चालविण्यात येत आहे. त्याने विविध कारणे देत जामीनासाठी सत्र न्यायालयापुढे अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाकडून त्याचा नियमित जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. अखेर आंबेरकर याने वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज न्यायालयाकडून मान्य करण्यात आला त्याला ६ आठवड्यांसाठी जामीन देण्यात आला होता.









