देवरूख:- देवरूख-रत्नागिरी मार्गावरील पाटगाव बसथांब्याजवळ दुचाकी आणि सुप्रो टेम्पोची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. आज दुपारी सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीवरील तरुण आणि तरुणी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी रत्नागिरीहून देवरूखच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. याचवेळी पाटगाव येथील गोपाळवाडीकडे जाण्यासाठी सुप्रो टेम्पो वळत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीची टेम्पोला जोरदार धडक बसली. धडक एवढी भीषण होती की दुचाकीच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर, पोलीस कॉन्स्टेबल सचिन लगारे, महिला हेड कॉन्स्टेबल आर्या वेलवणकर आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल रेश्मा चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून अपघाताचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते. या अपघातामुळे देवरूख-रत्नागिरी मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.









