Sunday, October 11, 2026
spot_img
Home गुन्हेगारी दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण; भावजयीसह पाच जणांवर गुन्हा

दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण; भावजयीसह पाच जणांवर गुन्हा

रत्नागिरी:- समाजमाध्यमावरील ‘पंचक्रोशी समाचार’ या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकलेल्या पोस्टचा राग मनात धरून, कामाच्या ठिकाणी घुसून एका दिव्यांग कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना शहरातील एमआयडीसी परिसरात घडली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडिताची भावजय सिद्धी विनायक शिर्सेकर, साक्षी शशांक शिरवडकर, शशांक विजय शिरवडकर, राहुल जगदीश करगुटकर (सर्व रा. जैतापूर, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) तसेच एका अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील नाचणे शांतीनगर येथील नवलाई संकुलमध्ये राहणारे श्रीकृष्ण देविदास शिर्सेकर (वय ४३) हे कर्णबधीर व दृष्टीदोष असलेले दिव्यांग असून ते मिरजोळे एमआयडीसी परिसरातील ‘स्टील आर्ट इंडस्ट्रीज’ (डी-१२) येथे नोकरी करतात. त्यांनी व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकलेल्या एका पोस्टमुळे संशयित त्यांच्यावर तीव्र नाराज होते. याच जुन्या वादाचा राग मनात धरून बुधवारी (ता. ७) दुपारी बाराच्या सुमारास संशयितांनी कंपनीच्या गेटमध्ये थेट प्रवेश केला. फिर्यादी हे दिव्यांग असल्याचे पूर्णपणे ठाऊक असतानाही संशयितांनी त्यांना शिवीगाळ करत हाताच्या चापटीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या अचानक झालेल्या हल्ल्यात शिर्सेकर यांच्या डोळ्याचा चष्मा फुटून त्यांचे आर्थिक नुकसान झाले असून ते जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मध्यरात्री पीडिताने ग्रामीण पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.