Saturday, November 7, 2026
spot_img
Home दापोली दापोलीतील रिसॉर्टमध्ये बेडवरून पडून पर्यटकाचा मृत्यू

दापोलीतील रिसॉर्टमध्ये बेडवरून पडून पर्यटकाचा मृत्यू

दापोली:- तालुक्यातील पाळंदे परिसरातील एका रिसॉर्टमध्ये चंद्रपूर येथील एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आनंद कार्तिक ढोके (वय ५५, रा. मजरा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) असे या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, ५ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास आनंद ढोके हे पाळंदे येथील सँड कॅस्टल बीच रिसॉर्टमधील एका खोलीत बेडवर आराम करत होते. यावेळी अचानक ते बेडवरून खाली पडले व निपचित अवस्थेत आढळून आले.

या अनपेक्षित घटनेनंतर त्यांना तात्काळ दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून दापोली पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.