पोलिसांची सोलापुरात कारवाई; अन्य दोघांचा शोध सुरू
चिपळूण:- ठेकेदाराची मोटार अडवून त्यांना तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना २८ नोव्हेंबरला बायपास मार्गावर घडली होती. या मारहाणीत ठेकेदार गंभीररीत्या जखमी झाले होते. मारहाण करणाऱ्यांपैकी एकाला चिपळूण पोलिसांनी सोलापूरहून ताब्यात घेत अटक केली. त्याला शनिवारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. स्वप्नील युवराज बनसोडे (वय २५, सोलापूर) असे त्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती, ठेकेदार अनिल मारुती चिले (वय ५८, पाचाड) २८ नोव्हेंबरला मोटारीने एकटेच गुहागर-बायपास रस्त्याने घरी जात होते. रात्री एका वळणावर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मोटारीच्या आडवी गाडी उभी केली. त्या तिघांपैकी एकाने ‘आमच्या दुचाकीला धडक देऊन पळून जाता काय?’ असे म्हणत साथीदारांनी मोटारीतून खाली खेचून मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर ते तिघेजण पळून गेले. याप्रकरणी तिघांवर चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. त्या आधारे मारहाण करणाऱ्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला. यामध्ये स्वप्नील
बनसोडे हा सोलापूर येथे असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक ओम आघाव, पोलिस हेडकॉन्स्टेबल संदीप माणके, पोलिस नाईक रोशन पवार, कॉन्स्टेबल रूपेश जोगी, शैलेश वनघे आदीच्या पथकाने सोलापूर जिल्ह्यातून स्वप्नील याला ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल असलेले अन्य दोघेजण गायब असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत.









