Thursday, September 10, 2026
spot_img
Home गुन्हेगारी टीडब्लूजे कंपनीच्या तीन संचालकांना अटक

टीडब्लूजे कंपनीच्या तीन संचालकांना अटक

गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

रत्नागिरी:- गुंतवणुकीवर तीन ते पाच टक्के परताव्यासह वर्षात सर्व रक्कम परत करण्याचे आमिष दाखवून पसार झालेल्या टीडब्लूजे लर्निंग सोल्युशनच्या दोघा संचालकांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी मे २०२६ मध्ये सहा संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. अटक केलेल्यांत समीर सुभाष नार्वेकर (वय ३६), नेहा समीर नार्वेकर (३६, दोघे रा. गिमवी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) आणि अमित विश्वनाथ बालम (३८, रा. कसाल, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) याचा समावेश आहे. तिघांना न्यायालयात हजर केले असता, १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

टीडब्लूजे लर्निंग सोल्युशन ही कंपनी सुभाष नार्वेकर (रा. माणगाव, ता. रायगड) याने सुरू केली होती. कंपनीत ९ लाखांच्या गुंतवणुकीवर ३ टक्के व्याज, १० लाखांच्या गुंतवणुकीवर ४ टक्के व्याज, २५ लाखांच्या गुंतवणुकीवर ५ टक्के व्याजाचे आमिष दाखविण्यात आले. तसेच वर्षात सर्व रक्कम परत करण्याचेही आश्वासन गुंतवणूकदारांना देण्यात आले होते.

कोल्हापुरात कावळा नाका येथील एका इमारतीत संशयित समीर नार्वेकरनें कार्यालय सुरू केले होते. येथेही जवळपास २ कोटी ५३ लाख रुपयांची रक्कम गुंतवणूकदारांनी गुंतविली होती. यातून १ कोटी ३८ लाख ७२ हजारांचा परतावा देणे लागत होते. अशी एकूण ३ कोटी ९३ लाखांची फसवणूक करून संचालक पसार झाले.

याप्रकरणी समीर नार्वेकरसह त्याची पत्नी नेहा, चिन्मय पालकर, विजय पताडे (रा. राधानगरी), निखिल सुर्वे, अमित बालम यांच्यासह अन्यं संचालकांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित पवार यांच्या पथकाने तीन संशयितांना ठाणे येथील कारागृहातून ताबा घेतला.