दोन्ही योजनेतील हजारापेक्षा अधिक कामे पूर्ण
रत्नागिरी:- ग्रामीण आणि शहरी भागातील मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या ‘जनसुविधा’ आणि ‘नागरी सुविधा’ योजनांच्या कामांना जिल्ह्यात वेग आला आहे. जनसुविधा योजनेतील ९०९ कामे पूर्ण झाली असून, नागरी सुविधा योजनेतील ९४ कामे पूर्ण झाली आहेत. प्रशासकीय मान्यता, निविदा आणि वर्कऑर्डरची प्रक्रिया वेगाने पूर्ण होत असल्याने विकासकामांना चालना मिळाली आहे.
जनसुविधा २०२४-२५ योजनेत जिल्ह्यात १,०६९ कामे मंजूर झाली. त्यापैकी ६८ कामे रद्द झाली असून, ९९९ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली. यातील ९०९ कामे पूर्ण झाली आहेत तर ८५ कामे प्रगतिपथावर आणि पाच कामे सुरू होणे बाकी आहेत. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक २८३ कामे पूर्ण झाली असून, लांजा १३२, राजापूर १३९, संगमेश्वर १०२, चिपळूण ८२, खेड ९९, गुहागर ३४, दापोली ३७ आणि मंडणगडमधील २१ कामांचा समावेश आहे.
नागरी सुविधा २०२५-२६ योजनेत २३३ कामे मंजूर झाली आहेत. त्यापैकी तीन कामे रद्द झाली असून, २११ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आतापर्यंत २०१ कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून, १९७ कामांना वर्कऑर्डर देण्यात आली आहे. त्यापैकी ९४ कामे पूर्ण, ७७ प्रगतिपथावर असून २६ कामे सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. रत्नागिरी तालुक्यातील ९१ मंजूर कामांपैकी ४५ पूर्ण झाली असून, ४५ कामे सुरू आहेत. संगमेश्वर, राजापूर, गुहागर आणि दापोली तालुक्यांतही अनेक कामे पूर्ण झाली आहेत.









