सार्वजनिक रस्त्यांवर वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी कारवाई
रत्नागिरी:- सार्वजनिक रस्ते, महामार्ग, बाजारपेठा तसेच रहदारीच्या ठिकाणी वाहने बेशिस्तपणे उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरोधात रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांकडून कारवाई करण्यात आली आहे. ३० ऑगस्ट २०२६ रोजी जिल्ह्यातील विविध ठिकाणी घडलेल्या या प्रकारांमध्ये एकूण ३९ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे सार्वजनिक रस्त्यांवर वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याचे स्पष्ट झाले आहे.
खेड तालुक्यातील भरणे येथे सर्व्हिस सेंटरसमोर सार्वजनिक रस्त्यावर सुझुकी ब्रिझा कार उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सुभाष कचरू धाकणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता ही घटना घडली. त्यानंतर ३० ऑगस्ट रोजी याच परिसरात सार्वजनिक रस्त्याच्या मध्यभागी ट्रक उभा केल्याप्रकरणी प्रकाश गंगाराम मोरे याच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच भरणे नाका महामार्गावरील पुलाजवळ ट्रक उभा करून रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अब्दुल अजीज सिराज रखांगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दाभोळ ते चिखलगाव मार्गावरील हॉटेल श्रीमांचधाबा परिसरात सार्वजनिक रस्त्यावर जेसीबी उभा केल्याप्रकरणी चंदू शंकर राठोड याच्यावर सागरी पोलिसांनी कारवाई केली. देवरूख येथे सावकर चौक ते कांजिवरा मार्गावर अॅपे टेम्पो उभा केल्याप्रकरणी विठ्ठल बाबुराव पवार याच्यावर, तर शिवाजी चौक ते सह्याद्रीनगर मार्गावर रस्त्याच्या विरुद्ध दिशेला मारुती सुझुकी इको कार उभी केल्याप्रकरणी विजय यशवंत भालेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सावर्डे बाजारपेठेत मुंबई-गोवा महामार्गावर मालवाहू वाहने उभी करून रहदारीस अडथळा निर्माण केल्याच्या तीन स्वतंत्र प्रकरणांत पोलिसांनी कारवाई केली. महिंद्रा विरो वाहन उभे केल्याप्रकरणी समीर चंद्रकांत चौगुले, अशोक लेलँड दोस्त वाहन उभे केल्याप्रकरणी सत्यवान श्रीरंग कांबळे आणि टाटा इंट्रा व्ही-१० वाहन उभे केल्याप्रकरणी कुलदीप शांताराम घडशी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मंडणगड बाजारपेठेतील मच्छी मार्केट परिसरात सार्वजनिक रस्त्यावर मारुती सुझुकी ८०० कार उभी केल्याप्रकरणी राजेंद्र श्रीधर कलवारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. नाटे ते धारतळे मार्गावर माताजी ट्रेडर्ससमोर महिंद्रा इंट्रा वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ताजीम इब्राहिम मुल्ला यांच्याविरुद्ध सागरी पोलिसांनी कारवाई केली.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी पोलीस चौकीसमोर सार्वजनिक रस्त्यावर जीप उभी केल्याप्रकरणी दीपक विष्णू काताळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याच ठिकाणी सायंकाळी पुन्हा जीप उभी करून रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शक्ती संजय सावंत यांच्यावरही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला.
लांजा बाजारपेठेतही वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. मुंबई-गोवा महामार्गावरील लोकमान्य वस्तू भांडारासमोर टाटा ट्रक गुड्स कॅरियर उभा केल्याप्रकरणी सचिन विजय भोंगळे, अपना बाजारसमोर अॅपे गुड्स कॅरियर उभे केल्याप्रकरणी भारत गंगाराम कांबळे आणि महालक्ष्मी बेकर्ससमोर अशोक लेलँड गुड्स कॅरियर उभे केल्याप्रकरणी अविनाश रमेश भामरे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच लांजा सर्व्हिस रोडवरील कैलाश स्टील सेंटरसमोर टाटा गुड्स कॅरियर उभे केल्याप्रकरणी अविनाश अशोक कुंभार आणि सोनाई हॉस्पिटलसमोर अशोक लेलँड गुड्स कॅरियर उभे केल्याप्रकरणी मोबीन अब्दुलगफूर मोटलानी यांच्यावरही कारवाई करण्यात आली.
संगमेश्वर परिसरात सार्वजनिक रस्त्यावर वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याच्या दोन प्रकरणांची नोंद झाली. संगमेश्वर बाजारपेठ ते रामपेठ मार्गावर प्रिया फूड्स दुकानासमोर महिंद्रा बोलेरो पिकअप उभी केल्याप्रकरणी संदीप राजाराम सकटे याच्यावर, तर संगमेश्वर ते चिपळूण मार्गावर महिंद्रा बोलेरो पिकअप उभी केल्याप्रकरणी संदेश संजय साबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. संगमेश्वर ते देवरूख मार्गावर दत्तकृपा मोबाईल शॉपीसमोर वॅगनर कार उभी केल्याप्रकरणी शैलेश प्रभाकर दाभाडे याच्यावरही पोलिसांनी कारवाई केली.
रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवांचीवाडी फाट्याजवळ खेडशी ते कुरवांबाव मार्गावर आयशर टेम्पो उभा केल्याप्रकरणी रोहन रोहिदास काटकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याच परिसरात सी.डी. डिलक्स मोटारसायकल सार्वजनिक रस्त्यावर उभी केल्याप्रकरणी विवेक नामदेव चव्हाण याच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला.
राजापूर तालुक्यातील जवाहर चौक ते गणेशघाट मार्गावरही पोलिसांनी कारवाई केली. राधिका हॉटेलसमोर ऑटो रिक्षा उभी केल्याप्रकरणी संतोष भानू राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याच मार्गावर बोलेरो पिकअप उभी केल्याप्रकरणी तुळशिदास रमेश जाधव यांच्यावर, तर जुनैद चिकन सेंटरसमोर युनिकॉर्न मोटारसायकल उभी करून रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रमेश सदाशिव कदम यांच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, काही प्रकरणांमध्ये केवळ वाहन रस्त्यावर उभे करण्याऐवजी रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता निष्काळजीपणे वाहन चालविल्याच्या प्रकारांचाही समावेश आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कोदवली येथील महालक्ष्मी मंदिराजवळील वळणावर कंटेनर चालविताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी सर्वजीत दुयोधन यादव याच्यावर राजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वाहनाची पुढील दोन चाके रस्त्याच्या साईडपट्टीवरून खाली उतरल्याची नोंद असून, या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील कलम २८१ तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अंतर्गत कारवाई करण्यात आली.
निवळी ते जयगड मार्गावरील कळझोंडी येथे बलकर ट्रक चालविताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी राजू भाऊराव फड याच्याविरुद्ध जयगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कळझोंडी फाटा क्रमांक दोन येथील वळणावर ट्रकची पुढील दोन चाके रस्त्याच्या साईडपट्टीवरून खाली उतरल्याची नोंद आहे.
अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेडांबे ब्रीज परिसरातही वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. टाटा आयशर वाहन चालविताना प्रतिबंधात्मक आदेशातील अटी व शर्तींचे उल्लंघन करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मलिक इस्माईल मुल्ला याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच परिसरात अशोक लेलँड वाहन चालवून रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अलू कमालसाब मुल्लेमनी याच्यावर, तर टाटा एलपी वाहनाच्या हालचालीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याप्रकरणी महेश रामचंद्र शिरगावकर याच्यावर कारवाई करण्यात आली. याच ठिकाणी अशोक लेलँड वाहन सार्वजनिक रस्त्यावर उभे केल्याप्रकरणी अमोल महादेव दनदुरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पावस एसटी स्टँडसमोर रत्नागिरी ते पूर्णगड मार्गावरील सार्वजनिक रस्त्यावर टाटा इंट्रा पिकअप उभी केल्याप्रकरणी फुलराम चुन्नीराम चौधरी यांच्यावर सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याच परिसरात आयशर ट्रक उभा करून रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शिवकुमार हलेप्पा मुल्लेमनी यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला.
खेड तालुक्यातील लेनजवळ गोवा ते मुंबई जाणाऱ्या महामार्गावर महिंद्रा सुप्रो वाहन उभे केल्याप्रकरणी मधुकर संभाजी तटकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तसेच भरणे येथील महामार्गावर महिंद्रा बोलेरो उभी केल्याप्रकरणी रमेश बाबुराव मनवळ याच्यावर कारवाई करण्यात आली. वेऱळ फाट्याजवळ महामार्गावर आयशर वाहन उभे केल्याप्रकरणी किरण बाबासाहेब जाधव याच्याविरुद्ध खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
चिपळूण शहरात एसटी स्थानकाच्या मागील अंतर्गत रस्त्यावर ताम्हाणे चेंबर्ससमोर बस उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ऋतुराज अनिल चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. देवरूखमधील कोंडगाव ते एसटी स्टँड बाहेरील मार्गावर अॅपे टेम्पो उभा केल्याप्रकरणी अरविंद केशव गांधी याच्यावरही पोलिसांनी कारवाई केली.
या सर्व प्रकरणांमध्ये सार्वजनिक रस्त्यावर वाहने अशा पद्धतीने उभी करण्यात आली किंवा चालविण्यात आली की, त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांना अडथळा आणि संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद करण्यात आले आहे. विविध पोलीस ठाण्यांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८५, २८१, २२३ तसेच संबंधित मोटार वाहन कायद्यांनुसार कारवाई केली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात वाहनांची मोठी वर्दळ वाढण्याची शक्यता असताना सार्वजनिक रस्ते आणि महामार्गांवरील वाहतुकीची शिस्त राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे रस्त्यावर मनमानी पद्धतीने वाहने उभी करून इतर वाहनचालक व पादचाऱ्यांना अडचण निर्माण करणाऱ्यांविरोधात पोलिसांची ही कारवाई पुढील काळातही सुरू राहण्याची शक्यता आहे.









