Saturday, September 26, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्ह्यातील ८४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘सायबर सुरक्षा व डिजिटल साक्षरतेचा’ जागर

जिल्ह्यातील ८४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘सायबर सुरक्षा व डिजिटल साक्षरतेचा’ जागर

जिल्हा परिषद व जिल्हा पोलीस दलाचा संयुक्त पुढाकार

रत्नागिरी:- सध्याच्या मोबाईल युगात वाढती सायबर गुन्हेगारी, ऑनलाईन फसवणूक आणि नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ८४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘सायबर सुरक्षा आणि डिजिटल साक्षरता’ या विषयावर व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. २१ ते २९ सप्टेंबर दरम्यान आयोजित विशेष ‘शैक्षणिक ग्रामसभां’च्या माध्यमातून हा जनजागृतीचा जागर थेट ग्रामीण भागातील घराघरांपर्यंत पोहोचवला जात आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत डिजिटल सुरक्षा आणि सायबर क्राईमपासून बचावाबाबत दृकश्राव्य सादरीकरण (प्रेझेंटेशन) केले जात आहे. तसेच, ऑनलाईन गैरव्यवहारांमधून नागरिकांचे कष्टाचे पैसे बँक खात्यातून लंपास होऊ नयेत आणि आर्थिक व्यवहारात कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेलाही या उपक्रमात सक्रिय सहभागी करून घेण्यात आले आहे.

या शैक्षणिक ग्रामसभांमध्ये सर्व वयोगटांतील शालेय विद्यार्थी, तरुण पिढी आणि त्यांचे पालक यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला जात आहे. मोबाईलचा सुरक्षित वापर, संशयास्पद लिंक्स व कॉल्सना न भुलणे आणि डिजिटल साक्षरतेचे महत्त्व यावर थेट संवाद साधला जात असून, या माध्यमातून प्रत्येक गाव सायबरदृष्ट्या सक्षम आणि सजग करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

पंतप्रधानांच्या कार्यकाळाच्या २५ व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून देशभरासह जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’चा हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या अभियानाची सुरुवात जिल्ह्यात रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिरे आणि वृक्षलागवडीने करण्यात आली आहे.
तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाणकोट ते नाटेपर्यंतच्या संपूर्ण किनारपट्टीवर दोन टप्प्यांत (गौरी-गणपती विसर्जनानंतर आणि अनंत चतुर्दशीनंतर) व्यापक सागरी स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. जिल्हा परिषदेच्या १६ विभागांच्या माध्यमातून महिनाभर आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण आणि लोकप्रबोधनाचे अनेकविध उपक्रम सक्रियपणे राबविले जात आहेत, अशी माहितीही वैदेही रानडे यांनी दिली.