दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:- महिंद्रा लेबर कॉलनी परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, दोन आरोपींनी मिळून मजुरांना जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. २१ जून रोजी रात्री १० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रप्रकाश ओमप्रकाश चौधरी (वय २४, सध्या रा. उंडी, रत्नागिरी) हे त्यांचे सहकारी विकास विश्वकर्मा यांच्यासोबत घरासमोर चुलीवर जेवण बनवत होते. यावेळी ते आपापसात मस्करी करत होते. त्याच वेळी जवळच खाटेवर झोपलेल्या रामलखन निसाद याच्या अंगाला फिर्यादीचा चुकून हात लागला.
यावरून चिडलेल्या रामलखन निसाद याने फिर्यादीला शिवीगाळ करत, “आमच्याकडे ४० माणसे आहेत, तुम्हाला दाखवू का?” अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने त्याचा साथीदार राजकुमार निसाद याला बोलावून घेतले. या दोघांनी मिळून फिर्यादी आणि उपस्थित साक्षीदारांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
आरोपींनी शेजारी पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यावर मारला, ज्यामुळे त्यांना दुखापत झाली. तसेच दुसऱ्या आरोपीने लाकडी बांबूने फिर्यादीसह विकास विश्वकर्मा, गुलाब विश्वकर्मा आणि प्रेमचंद्र विश्वकर्मा यांना मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी फिर्यादीच्या घराचा दरवाजा तोडून नुकसान केले आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी चंद्रप्रकाश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, रत्नागिरी पोलीस स्थानकात रामलखन निसाद आणि राजकुमार निसाद (दोन्ही सध्या रा. महिंद्रा लेबर कॉलनी, रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३२४(४), ३५१(२), ३५२ आणि ३(५) नुसार अधिक तपास करत आहेत.









