Saturday, July 11, 2026
spot_img
Home खेड जमिनीला मोठे तडे; १५ घरांवर दरडीचे संकट

जमिनीला मोठे तडे; १५ घरांवर दरडीचे संकट

खेड आपेडे मोरेवाडी येथील घटना

खेड:- मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यात भूस्खलन, दरडी कोसळणे आणि जमिनीला तडे जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच तालुक्यातील आपेडे गावातील मोरेवाडी येथे जमिनीला मोठमोठे तडे गेल्याने १५ घरांवर दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून, परिसरात भीतीचे वातावरण आहे. या घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

मोरेवाडीतील सुलोचना गणपत मोरे आणि सखाराम मोरे यांच्या घराच्या वरच्या बाजूस असलेल्या डोंगर उतारावरील जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जमिनीची पकड सैल झाली असून या भेगा दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या ठिकाणी मोठी दरड कोसळल्यास खालील बाजूस असलेल्या संपूर्ण मोरेवाडीला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोरेवाडीत एकूण १५ घरे असून त्यापैकी ८ घरांमध्ये नागरिक वास्तव्यास आहेत, तर उर्वरित घरे बंद आहेत. संभाव्य भूस्खलनाचा धोका लक्षात घेता येथील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अद्याप स्थलांतराची वेळ आलेली नसली तरी महसूल प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या तसेच आवश्यक वाटल्यास तातडीने सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
आपेडे येथील मोरेवाडीत जमिनीला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याची माहिती मिळताच महसूल प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. प्रांताधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार सुधीर सोनवणे आणि मंडळ अधिकारी उमाकांत देशमुख यांनी धोक्याची तीव्रता तपासून संबंधित विभागांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असून परिसरावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.