महामार्गावर दरड कोसळली, तर अनेक गावांचा वीजपुरवठा विस्कळीत
चिपळूण:- गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात खेड ते परशुराम दरम्यान ओमेगा हॉटेल समोर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळून माती आल्याने काही काळ एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू ठेवण्यात आली. तर चिपळूण शहरातील बाजार पुलाजवळील शौचालयावर झाड कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला. तसेच पोसरे भोम मार्गावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
चिपळूण शहरासह ग्रामीण भागात सोमवारी मुसळधार पाऊस झाला. रविवारी झालेल्या मुसळधार पावसात आकले येथील ११ केव्ही तिवरे फिडरवरील पाच वीज खांब कोसळले. त्यामुळे आकले, कादवड, तिवरे, रिक्टोली, तिवडी आणि इंदापूर ही सहा गावे पूर्णपणे अंधारात गेल्याने सुमारे १,१०० वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित झाला होता. मिरजोळी सहकारवाडी परिसरातील तीन इमारतींचे वीज केबिन पाण्याखाली गेल्याने दुर्घटना टाळण्यासाठी ११ केव्ही मालदोली फिडरचा वीजपुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आला. सोमवारी देखिल उक्ताड–मिरजोळी मार्गावर पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. पिलवली तर्फे वेळंब येथे घरावर नारळाचे झाड पडल्याने नुकसान झाले, तर नांदगाव बुद्रुक येथे घरावर झाड कोसळून पत्रे तुटली. काळसूर-कौढर येथे घरावर झाडाची फांदी पडल्याने अंशतः नुकसान झाले. तोंडली–कळंबटेवाडी येथे वादळामुळे घरावरील पत्रे उडून गेल्याची घटना घडली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर परशुराम येथे ओमेगाव हॉटेल समोर दर्डीची माती रस्त्यावर आल्याने काही काळ एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली माती बाजूला केल्यानंतर या मार्गावरील दुहेरी वाहतूक सुरू झाली. भोम पोसरे मार्गावर रस्त्यावर मोठे झाड पडल्याने तासभर वाहतूक ठप्प झाली होती. कटर च्या सहाय्याने कटाई केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. शहरातील बाजार पुलाजवळील पालिकेच्या शौचालयावर मोठे झाड पडल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. येथील झाड बाजूला करून दुरुस्ती झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. गेल्या 24 तासात 130.77 मिमी पावसाची नोंद झाली असून यंदाच्या हंगामातील एकूण पर्जन्यमान 821.66 मिमी इतके झाले आहे. मंगळवारी देखील मुसळधार पावसाचा इशारा कायम असल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. महावितरणची पथके विविध ठिकाणी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत असून परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे.









