संगमेश्वर:- विनापरवाना गुरांची वाहतूक करणारी तीन वाहने देवरूख पोलिसांनी पकडली. देवरूख येथे एक व साखरपा येथे दोन अशी तीन वाहने देवरूख व साखरपा पोलिसांनी पकडून गुरांची विनापरवाना वाहतूक करणारी तीन वाहने देवरूख पोलिसांनी पकडली.
या कारवाईत दोन म्हैशी व सहा बैलांची सुटका करण्यात आली असून संबंधित वाहन चालकांविरोधात देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी सायंकाळी व रात्री करण्यात आली आहे. याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, देवरूख सह्याद्रीनगर येथे सोमवारी रात्री १.१५ वा. गस्त घालत असताना विनापरवाना गुरांची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडी पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी या गाडीची तपासणी केली असता यामध्ये चार बैल दाटीवाटीने गाडीच्या हौद्यात बांधलेले दिसले. गुरांच्या वाहतुकीचा कोणताही परवाना चालकाकडे नसल्याने पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन गाडीतील चार बैलांची सुटका केली. पोलिसांनी अवैधरित्या गुरांची वाहतूक करणाऱ्या नितीन गंगाराम चव्हाण (रा. खेड. जि. रत्नागिरी) व रोहन अंकुश साळुंखे (रा. कराड. जि. सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ४.३० वा. व सायंकाळी ४.४५ वा. साखरपा तळवाडी येथे विनापरवाना गुरांची वाहतूक करणारी दोन वाहने पकडली. यात एका गाडीत दोन म्हैशी व दुसऱ्या गाडीत दोन बैल आढळून आले. विनापरवाना गाडीतून दोन म्हैशींची वाहतूक केल्याप्रकरणी संतोष गजबार (रा. तेये, ता. संगमेश्वर. जि. रत्नागिरी) व संतोष जांगळी (रा. येगाव. ता. चिपळूण. जि. रत्नागिरी) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सायंकाळी ४.४५ वा. केलेल्या कारवाईत विनापरवाना दोन बैलांची वाहतूक करणारी गाडी पोलिसांनी पकडली. यात दोन बैल आढळून आले. या कारवाईत गणेश लांबोरो (रा. धुंदरे. ता. लांजा. जि. रत्नागिरी) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या तिन्ही वाहन चालकांकडे जनावरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवाना व कागदपत्रे नसल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरोधात व सहकाऱ्यांविरोधात पोलिसांनी रितसर तक्रार दाखल करत गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास देवरूख पोलीस करत आहेत .









