Monday, May 25, 2026
spot_img
Home संगमेश्वर कोसुंब येथे क्रेनच्या चाकाखाली चिरडून महिलेचा मृत्यू

कोसुंब येथे क्रेनच्या चाकाखाली चिरडून महिलेचा मृत्यू

देवरुख:- रस्त्यालगत दुचाकीच्या बाजुला उभ्या असलेल्या महिलेला क्रेनने जोरदार धडक दिल्याने चाकाखाली चिरडून या महिलेचा जागीच मृत्यू झाला. देवरुख-संगमेश्वर मार्गावरील कोसुंब नजीक असलेल्या स्वामी समर्थ मठ येथे सावित्री राजाराम सावंत (रा. कनकाडी एरंडेवाडी, ता. संगमेश्वर, वय ६५ वर्ष) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

देवरुख पोलीस स्थानकातुन मिळालेल्या माहितीनुसार, जयेंद्र गजानन सावंत (रा. कनकाडी एरंडेवाडी) यांनी याबाबतची फीर्याद दिली आहे. जयेंद्र सावंत व सावित्री सावंत या दुचाकीवरून (क्रमांक एमएच ०८- एन-०३८८) रविवारी सकाळी बुरंबी येथील मुलीकडे जात होत्या. बुरंबीच्या दिशेने जात असताना कोसुंब नजीक असलेल्या स्वामी समर्थ मठ येथे जयेंद्र सावंत याने दुचाकी थांबवली होती.

यावेळी सावित्री सावंत या रस्त्यालगत दुचाकीच्या बाजुला उभ्या होत्या.यावेळी एहम्मद अली रझा (रा. उत्तर प्रदेश, वय २७ वर्ष) हा क्रेन घेऊन (क्रमांक एमएच-४३-बी- १३४५) देवरुखहून-संगमेश्वरच्या दिशेने निघाला होता. एहम्मदने बेदकारपणे क्रेन चालवित, क्रेनवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकीला तसेच सावित्री सावंत यांना क्रेनची जोराची धडक दिली. यात सावित्री या क्रेनखाली चिरडल्या गेल्या. यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. दुचाकीस्वाराच्या पायाला देखील दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दिलेल्या फीर्यादीनुसार एहमद रझा याच्यावर देवरुख पोलीस स्थानकात बीएनएस १०६ (१), १२५ (अ), १२५ (ब), २८१, मोटार वाहन कायदा कलम १८४, ३(१)/१८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव जाधव करीत आहेत.