कोतवडे खून प्रकरणाचा तपास अद्यापही दिशाहीन; संशयित आरोपी अद्याप मोकाट

रत्नागिरी:- कोतवडे येथील दिलीप रामचंद्र रामाणे ( ६० ) खून प्रकरणाला १८ दिवस उलटूनही ग्रामीण पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश आलेले नाही. या खूनप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत गावातीलच अनेक जणांची चौकशी केली, परंतु संशयितांकडून काहीच माहिती न मिळाल्याने तपासाला खीळ बसलेली आहे.

शुक्रवार १७ मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास कोतवडे येथील बौद्धवाडीच्या स्मशानभूमीजवळ एका आंब्याच्या बागेत दगडाने डोके ठेचलेल्या अवस्थेत रामाणे यांचा मृतदेह मिळून आला होता. गावातीलच काही तरुणांनी तो मृतदेह पाहून ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली होती. या खुनाचा उलगडा करण्यासाठी ग्रामीण पोलिस कोतवडे येथे तळ ठोकून आहेत. पोलिसांनी अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले, मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही. घटनास्थळी केवळ रामाणे यांना मारण्यासाठी वापरण्यात आलेला दगड पुरावा म्हणून पोलिसांच्या हाती लागलेला आहे. काही संशयितांची कसून चौकशी करण्यासाठी त्यांना ग्रामीण पोलिस ठाण्यातही बोलावण्यात आले होते. परंतु , आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.