Wednesday, July 22, 2026
spot_img
Home गुन्हेगारी कोकणनगर येथे दुचाकी खरेदीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण

कोकणनगर येथे दुचाकी खरेदीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण

एकाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- दुचाकी खरेदीसाठी दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादात एका तरुणावर चाकूने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना रत्नागिरी शहरातील कोकणनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात एकाविरोधात दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २१ जुलै रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास नायब रेसिडेन्सी, कोकणनगर, रत्नागिरी येथे घडली. या प्रकरणी प्रेम गोपी परियार (वय ३२, रा. मारीगोल्ड सोसायटी, वॉचमन रूम, कुवारबाव, रत्नागिरी, मूळ रा. नेपाळ) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

प्रेम परियार हे त्यांचे नातेवाईक अर्जुन यांच्यासह आरोपी रमेश पुरण विश्वकर्मा (वय २६, रा. नायब रेसिडेन्सी, कोकणनगर, रत्नागिरी) याला त्याच्या घरी सोडण्यासाठी गेले होते. त्यानंतर परत येत असताना प्रेम परियार यांनी यापूर्वी आरोपीकडून घेतलेल्या दुचाकीचे पैसे दिले असल्याने गाडी घेऊन जात असल्याचे सांगितले. मात्र, आरोपीने गाडी देण्यास नकार दिला आणि पैसेही परत करणार नसल्याचे सांगितले.

यावेळी दोघांमध्ये वाद झाला. दिलेले पैसे परत करण्याची मागणी केल्याचा राग आल्याने आरोपीने प्रेम परियार यांना शिवीगाळ करत धक्का दिला. त्यानंतर चाकूने त्यांच्या डोक्यावर वार करून दुखापत केली तसेच धक्का दिल्याने त्यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली, अशी तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे.

या घटनेत जखमी झालेल्या प्रेम परियार यांच्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ अंतर्गत आरोपी रमेश विश्वकर्मा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करत आहेत.