Thursday, October 29, 2026
spot_img
Home गुन्हेगारी कोकणनगर येथे घरफोडी; २ लाख २० हजारांची रोकड लांबवली

कोकणनगर येथे घरफोडी; २ लाख २० हजारांची रोकड लांबवली

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील कोकणनगर येथील राधाकृष्ण नगर भागात एका बंद घराचा कडी-कोयंडा आणि खिडकीचे लॉक उचकटवून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २ लाख २० हजार रुपयांची रोकड लांबवल्याची मोठी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेक अबरार हाज (वय ४०, रा. राधाकृष्ण नगर, कोकणनगर, ता. जि. रत्नागिरी) यांच्या राहत्या घरी ही चोरी झाली.

दिनांक २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेपासून ते दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. या कालावधीत फिर्यादीचे घर बंद असताना, अज्ञात चोरट्यांनी घराच्या हॉलमधील स्लायडिंग खिडकीचे कायमस्वरूपी लॉक कोणत्या तरी हत्याराच्या साहाय्याने उचकटवले. त्यानंतर खिडकीवाटे घरात प्रवेश करून बेडरूममध्ये ठेवलेल्या पत्र्याच्या पेटीचे लॉक व कडी हत्याराने तोडली. पेटीत ठेवलेली २,२०,००० रुपये रोख रक्कम चोरट्यांनी फिर्यादीच्या संमतीशिवाय, लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या फायद्यासाठी चोरी करून नेली.

​या प्रकरणी दिनांक २८ ऑक्टोबर रोजी रात्री ११.११ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोकणनगरसारख्या दाट वस्तीच्या परिसरात घडलेल्या या घरफोडीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.