अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील कोकणनगर परिसरातील सनराईज रेसिडेन्सीजवळ अज्ञात इसमाने मुक्या प्राण्यांवर अत्यंत क्रूर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. विषारी पावडर खायला घालून कुत्र्याच्या एका पिल्लाचा जीव घेतल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० सप्टेंबर रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या पूर्वी सनराईज रेसिडेन्सी (फ्लॅट नं. जे/००१) जवळ, नायब नगर, कोकणनगर, रत्नागिरी येथे घडली. परिसरातील अज्ञात इसमाने कुत्र्याच्या पिल्लांना खाण्यात कोणतरी विषारी पावडर मिसळून खायला दिली. ही विषारी पावडर खाल्ल्यामुळे बिचाऱ्या मुक्या प्राण्यांना तीव्र वेदना व यातना सहन कराव्या लागल्या. या क्रूर प्रकारात एका कुत्र्याच्या पिल्लाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर पिल्लेही गंभीर धोक्यात आली आहेत.
या अमानुष घटनेबाबत मोहम्मद सैफ समिर काझी (वय २६, व्यवसाय: गाडी चालक, रा. फ्लॅट नं. जे/००१, सनराईज रेसिडेन्सी, कोकणनगर, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२५ आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (a) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षकांकडून केला जात असून, मुक्या प्राण्यांना अशा प्रकारे विषबाधा करून मारणाऱ्या अज्ञाताचा शोध घेण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज व परिसरातील पुराव्यांच्या आधारे कसून चौकशी करत आहेत. शहरात घडलेल्या या प्रकारामुळे प्राणीप्रेमींसह नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.









