कारवांचीवाडी येथील अल्पवयीन मुलाचे अपहरण

रत्नागिरी:- जेवताना पापड खाण्यावरुन मुलांनामध्ये किरकोळ भांडण झाल्याच्या रागातून अल्पवयीन मुलगा घरात कुणालाही काही न सांगता निघून गेला. शहर पोलिस ठाण्यात फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. १५) दुपारी साडेबाराच्या सुमारास कारवांचीवाडी-रवींद्रनगर येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची मुलगी व मुलगा दुपारी जेवण करत असताना पापड खाण्यावरुन किरकोळ भांडण झाले. याचा राग मनात धरुन मुलगा घरात न सांगता निघून गेला. फिर्यादी यांनी बसस्थानक, मित्र मंडळी, शिक्षकवर्ग यांच्याकडे चौकशी केली. मात्र सापडला नाही. या प्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी अल्पवयीन मुलाला कोणतरी अमिष दाखवून फुस लावून पळवून नेणाऱ्या अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.