खेड:- कोकणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाटात दरड कोसळल्याची मोठी घटना समोर आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरडीसह मोठ्या प्रमाणात माती आणि दगड आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, महामार्ग प्राधिकरण आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या रस्ता साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, महामार्गावर मोठ्या प्रमाणात दगड-माती साचल्याने वाहतूक पूर्ववत होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली असून, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
सततच्या पावसामुळे डोंगरकड्यांवरून दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने वाहनचालकांना आणि नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घाटमार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. पावसाचा जोर अद्यापही कायम असल्याने प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.









